नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीचा सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला असून, हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. एका अंदाजानुसार, सेवा क्षेत्रात ३३ टक्के रोजगार असून, जीडीपीतील योगदान ५५ टक्के आहे. मागील १६ वर्षांपासून सातत्याने विकास पावणारा खाद्य उद्योग कोविड-१९ महामारीमुळे पार कोसळला आहे. दहा हजार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशन आॅफ हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन आॅफ इंडियाने (फ्राय) म्हटले की, निर्बंध हटल्यानंतर आपल्या केवळ २० टक्के सदस्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला होता. तथापि, ग्राहकच नसल्यामुळेत्यातील २० ते ३० टक्के लोक व्यवसाय पुन्हा बंद करण्याचे नियोजन करीत आहेत.
रेस्टॉरंट शृंखला ‘सागररत्ना’चे व्यवस्थापकीय संचालक रोशन बनान यांनी सांगितले की, आमचे ७ हजार कामगार आपापल्या राज्यांत परतले आहेत. यातील बहुतांश कामगार आसाम, ओडिशा आणि बिहार या राज्यांतील होते. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील धीरजकुमार (३३) हे मुंबईतील एका कॅफेत शेफ होते. कॅफे बंद पडल्यानंतर गेल्या महिन्यात ते आपल्या गावी परतले. ‘ही अनिश्चितता निराशाजनक आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले आहेत.अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वस्तू उत्पादनासारख्या अनेक क्षेत्रांत सुधारणा झाली असली तरी सेवा क्षेत्र अजूनही रुळावर येण्यासाठी चाचपडताना दिसत आहे. रेस्टॉरंट्सना आता रात्री १0 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी लोकांची पावले अजून तिकडे वळलेली नाहीत. रेस्टॉरंट्सचा दोन-तृतीयांश महसूल जेवायला येणाºया ग्राहकांकडून मिळतो. ग्राहकच नसल्यामुळे व्यवसायच नाही.