नवी दिल्ली : कोझिकोडेमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला अपघात झाल्यानंतर या विमानतळाच्या रनवेच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अर्थात या अपघाताची चौकशी सुरू असून, त्याच्या अहवालावर या रनवेचे भवितव्य अवलंबून आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.या विमान अपघातात पायलटसह १८ जणांचा मृत्यू झाला होता. गतवर्षीही रनवे विस्ताराचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, राज्य सरकार विमानतळ डेव्हलपर्सना अतिरिक्त जमीन देऊ शकले नाही. केरळात दरवर्षी मोठा पाऊस होतो आणि त्यामुळे विमान उतरण्याचा धोका वाढतो. कारण, या रनवेवर घर्षण कमी होते. मागील आठवड्यात झालेला अपघात एवढा भयंकर होता की, विमानाचे अक्षरश: तुकडे झाले. मंगलोरमध्ये २०१० मध्ये अशाच एका अपघातात १५८ लोकांचा मृत्यू झाला होता.अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१७ मध्ये एएआयने २७५० मीटर रनवेचा ८०० मीटरपर्यंत विस्तार करण्याची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी केरळ सरकारकडून जमीन देण्याची प्रतीक्षा सुरू होती. एका अधिकाºयाने असेही सांगितले की, नवीन विस्ताराची योजना ही अपघाताच्या अहवालावर अवलंबून आहे.
कोझिकोडे रनवेचा विस्तार होणार?; एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:03 AM