हरीश गुप्ता / नवी दिल्ली ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करा, अशी सूचना मोदी सरकारला करणारा अर्थक्रांती हा सल्लागार गट, सरकारने दोन हजार रुपयांची नोट आणल्याबद्दल अस्वस्थ झाला आहे. या गटाने आपल्या सूचनेनुसार मोठ्या मूल्यांच्या चलनी नोटा रद्द केल्याबद्दल आनंदच व्यक्त केला, परंतु मोदी सरकारने दोन हजार रुपयांची नोट व्यवहारात आणल्याचा रागही त्याला आहे. व्यवहारातून काळा पैसा काढून टाकण्यासाठीच्या सूचनांचे अर्थक्रांतीने नरेंद्र मोदी यांच्यासमोर दोन तासांचे सादरीकरण केले होते. पुणेस्थित अर्थक्रांती गटाच्या नेत्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटेचा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या निदर्शनास आणून दिला. ही नोट आणल्याने काळा पैसा काढून टाकण्याच्या उद्देशालाच सुरुंग लागला असल्याचे त्यांनी जोशी यांना सांगितले. जोशी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांची नोट रद्द करण्यावरील भाष्यात सावध भूमिका घेतली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत दोन कार्यक्रमांत भाषण केले. परंतु त्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलेले नाही.संघाने नेहमीच काळ््या पैशाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्याने याच कारणासाठी जयप्रकाश नारायण आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यासोबत काम केले आहे. जयप्रकाश नारायण आणि सिंह हे मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्यास अनुकूल होते, परंतु दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणल्यामुळे काळ््या पैशाला नष्ट करण्याचा नेतृत्वाचा हेतूच साध्य होणार नाही, तर येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत आणखी काळा पैसा निर्माण होणार आहे.प्रामाणिकपणा, सचोटीवर ताशेरे ओढणे योग्य नाही-अर्थक्रांती गटाचे कडवे समर्थक बाबा रामदेव यांनी ५०० व एक हजार रुपयांची नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे एका निवेदनाद्वारे समर्थन केल्यानंतर आता मात्र, मौन धारण केले आहे. मोदी यांनी जपानमध्ये काळ््या पैशांवर अत्यंत कठोरपणे केलेल्या हल्ल्यावरही भाजपाचे काही वरिष्ठ खासदार संतप्त आहेत. बहुसंख्य संसद सदस्यांनी सोन्यावर कर आकारण्याला विरोध करणारे निवेदन मला दिले होते. माझ्याकडे ती कागदपत्रे असून, मी त्यांची नावे जाहीर केली, तर त्यांना त्यांच्या मतदारसंघात लपायला जागा मिळणार नाही, असे मोदी म्हणाले होते. या वक्तव्यामुळे खासदार दुखावले. त्यांचे म्हणणे असे होते की, सोन्यावर लादल्या जाणाऱ्या कराला व्यापाऱ्यांचा विरोध असून, तो केवळ आम्ही मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. त्या आधारे आमचा प्रामाणिकपणा आणि सचोटीवर ताशेरे ओढणे योग्य नाही, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
नोटाबंदीवर ‘अर्थक्रांती’ अस्वस्थ
By admin | Published: November 15, 2016 2:12 AM