ऑनलाइन लोकमत -
हैद्राबाद, दि. १२ - स्टंट करण्याच्या नादात आगीत भाजलेल्या 19 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी जलील-उद-दीन स्टंटची प्रॅक्टीस करत होता. स्टंट करत असताना आपण तो कसा केला आहे हे पाहण्यासाठी त्याने गल्लीतल्या लहान मुलांना मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला होतं. मात्र स्टंटमध्ये झालेल्या चुकीमुळे जलील-उद-दीनला आपला जीव गमवावा लागला आहे.
जलील-उद-दीनला 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी व्हायचं होतं. आपण तरबेज नसतानाही त्याने स्टंट करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जलील-उद-दीनने अगोदर आपल्या तोंडात केरोसीन घेऊन आगीचे भडके उडवले. त्यानंतर सगळ्या अंगावर केरोसीन ओतून घेतलं आणि स्वत:ला आग लावून घेतली ज्यामध्ये जलील-उद-दीन भाजला गेला. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून लहान मुलांनीदेखील तेथून पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जलील-उद-दीनला रुग्णालयात उपचारासाठी उस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज मंगळवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जलीलच्या आई-वडिलांना मात्र त्याला अशा कोणत्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होण्याबद्दल काही कल्पना नव्हती. मृत्युपूर्वी जलीलने आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.