मुंबई : राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
आज दिवसभरतात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र, यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी चुरस असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.
देशातील विविध श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण 'जन्मभूमी' असलेल्या मथुरेतील मंदिराला विशेष सजावट करण्यात आली आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात जन्माष्टमी साजरी केली. यावेळी त्यांनी उपस्थित लहान मुलांसोबत गप्पा सुद्धा मारल्या आणि मुलांना प्रसादाचे वाटप केले. याचबरोबर मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात देखील जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय, देशातील केरळ, दिल्ली, जम्मू, गुजरातमध्ये सुद्धा जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीरमुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन आणि शालेय शिक्षण विभागामार्फत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
मुंबईतील बड्या आयोजकांचा गोपाळकाला रद्दकालिदास कोळंबकर आयोजित हंडी, अरुण दुधवडकर यांचा एसी मार्केटमध्ये होणारा उत्सव, गिरगावमध्ये पांडुरंग सकपाळ यांचा गोपाळकाला रद्द करण्यात आला आहे. तसेच घाटकोपरचे आमदार आमदार राम कदम, मागाठाण्यातील आमदार प्रकाश सुर्वे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे यांनीही दहीहंडी आयोजन रद्द केले आहे. कुर्ला, दादर, घाटकोपर, बोरीवली, चारकोप, गिरगाव या भागातही दहीहंडी परवानगी अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.