महाराष्ट्रासह विविध राज्यांत ईडी, सीबीआयच्या रडारवर त्या राज्यांचे मंत्री, नेते आलेले असताना कर्नाटकमध्येभाजपाचा एक बडा मंत्री वसुलीप्रकरणात अडकला आहे. ठेकेदाराने आत्महत्या केल्याने के एस ईश्वरप्पा उद्या राजीनामा देणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनीच स्वत: पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. क्लिन चिट घेऊन पुन्हा येणार असल्याचे ते म्हणाले.
ईश्वरप्पा यांच्यावर सरकारी ठेकेदार संतोष पाटील याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईश्वरप्पा यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ईश्वराप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा देतील.
ठेकेदार संतोष पाटील सोमवारी उडुपीमध्ये मृतावस्थेत आढळले होते. काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या एका मित्राला मेसेज करून आत्महत्येसाठी मंत्री ईश्वरप्पा यांना जबाबदार असल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच संतोष पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, ईश्वराप्पा त्यांच्याकडे कामाच्या बदल्यात ४० टक्के कमिशन मागत आहेत. ईश्वराप्पा यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते.
ईश्वराप्पा हे कर्नाटकमधील भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय होते. माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पांवर ईश्वराप्पा यांनी गेल्या वर्षी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच येडियुराप्पा जर मुख्यमंत्री राहिले तर पुढील निवडणूक जिंकणे भाजपाला जड जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. येडियुराप्पांना मुख्यमंत्री पदावरून घालविण्यात त्यांचा मोठा हात होता.