नवी दिल्ली: पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला आहे. विशेष म्हणजे १५-१ अशा फरकानं हा निकाल भारताच्या बाजूनं लागला. यामुळे भारताला मोठा दिलासा असून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.आंतरराष्ट्रीय न्यायालयानं मेरिटच्या आधारे भारताच्या बाजूनं निकाल सुनावला. जाधव यांना काऊन्सिलर ऍक्सिस द्यायला हवा होता. मात्र तो त्यांना दिला गेला नाही, असं न्यायालयानं म्हटलं. यासोबतच पाकिस्ताननं जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, अशी सूचनादेखील न्यायालयानं केली. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार होईपर्यंत त्यांना दिलेली शिक्षा स्थगित करण्यात येईल. याशिवाय पाकिस्ताननं जाधव यांना काऊन्सिलर ऍक्सिस द्यावा, अशी स्पष्ट सूचना न्यायालयानं केली आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसंच आपला निर्णय राखून ठेवला होता. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल दिला. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
भारताची जीत; कुलभूषण जाधवप्रकरणी 'या' १६ न्यायाधीशांचे होते पॅनल