हेग: पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला आहे. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दोन्ही देशांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर आपला निकाल राखून ठेवला होता. हा महत्त्वपूर्ण निकाल देताना पाच मुद्दे महत्त्वाचे ठरले. भारतीय वकिलातीची तत्परता- या प्रकरणात भारतीय वकिलातीनं तत्परता दाखवली. जाधव यांना अटक होताच त्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला वारंवार पत्र लिहून काऊन्सिलर अॅक्सेसची मागणी केली. जवळपास १५ वेळा भारतानं ही मागणी केली होती. मात्र पाकिस्ताननं ही मागणी मान्य केली नाही. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात महत्त्वाचा ठरला.व्हिएन्ना कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन- पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचं भारतानं न्यायालयाला दाखवून दिलं. पाकिस्ताननं व्हिएन्ना करारावर स्वाक्षरी केल्यानं या करारातील नियमांचं पाकिस्तान उल्लंघन करू शकत नाही, असा युक्तिवाद भारताकडून वकील हरिश साळवेंनी केला. राजनैतिक अधिकार कायम राहणार- न्यायालयाच्या निकालामुळे कुलभूषण यांचे राजनैतिक अधिकार कायम राहणार आहेत. त्यामुळे त्यांना काउन्सिलर ऍक्सेस मिळू शकेल.फाशीचा पुनर्विचार- याआधी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. ती स्थगिती न्यायालयानं आजही कायम राखली. याशिवाय पाकिस्तानला शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत.१५-१च्या फरकानं भारताच्या बाजूने निकाल- विशेष म्हणजे न्यायालयाच्या खंडपीठानं १५-१ अशा फरकानं भारताच्या बाजूनं निर्णय दिला. एकमेव न्यायाधीशानं जाधव यांच्या विरोधात मत नोंदवलं. हे न्यायाधीश पाकिस्तानचे आहेत.