ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने दिलेल्या फाशीचं प्रकरण भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊन सर्वात मोठी चूक केली असल्याचं म्हटलं आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराच्या न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
फेसबुकवर एक पोस्ट करून काटजू यांनी कुलभूषण जाधव प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊन चूक केल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानला खूप आऩंद झाला असेल की आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलो. कारण आता कोणताही मुद्दा असेल विशेष म्हणजे कश्मिरचा मुद्दा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलू शकतं. एका अर्थी आपण पाकिस्तानला त्यांचा डाव खेळू दिला असेच म्हणावे लागेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपणच त्यांना इतर मुद्यांवर बोलण्याची आयती संधी दिली. त्यामुळेच पाकिस्ताननेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा फारसा विरोध केला नाही, असे ते म्हणाले.
भारतासाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत, भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निकाल सुनावताना जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली. काय आहे काटजूंची पोस्ट-
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अॅण्ड अॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.