इस्लामाबाद : हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांची भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट घेऊ देण्याची तयारी पाकिस्तानने दर्शविली आहे.
कुलभूषण जाधव यांच्या अटकेची माहिती त्वरित न कळवून व जाधव यांना त्यांच्या देशाच्या वकिलातीच्या अधिकाºयांची भेट न घेऊ देऊन पाकिस्तानने जिनेव्हा कराराचा भंग केल्याचा निकाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १७ जुलै रोजी दिला होता. अटकेतील परकीय नागरिकास वकिलातीच्या अधिकाºयांना भेटू देण्यास राजनैतिक भाषेत ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ असे म्हटलेजाते. पाकिस्तानने जाधव यांना ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ देऊन झालेल्या चुकीचे परिमार्जन करावे व त्यानंतर जाधव यांच्या शिक्षेचा ‘परिणामकारक’ फेरविचार करावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता.
गेले दोन आठवडे पाकिस्तान आम्ही ‘कॉन्स्युलर अॅक्सेस’ देणार आहोत व त्याची तयारी सुरू आहे, असे सांगत होते. मात्र पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी गुरुवारी साप्ताहिक वार्तालापात सांगितले की, आता आमची तयारी झाली आहे. भारतीय वकिलातीचे अधिकारी जाधव यांना उद्या (शुक्रवारी) भेटू शकतात. काश्मीरचा तंटा सोडविण्यासाठी भारत व पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दर्शविली याचे फैजल यांनी स्वागत केले. मात्र यावर भारताने व्यक्त झालेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती, असे ते म्हणाले. त्यांचे म्हणणे होते की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाच्या चौकटीत चर्चा व्हावी ही पाकिस्तानची भूमिका आजही कायम आहे. भारताचा निर्णय अभ्यासानंतरच्पाकिस्तानने हा प्रस्ताव दिला असला तरी तो स्वीकारायचा की नाही, यावर भारताचा निर्णय संध्याकाळपर्यंत झालेला नव्हता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानने त्यांचा हा प्रस्ताव अधिकृतपणे आम्हाला कळविला आहे.च्हेग न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करून त्याबाबतचा निर्णय राजनैतिक मार्गाने पाकिस्तानला कळविला जाईल. माध्यमांमधून याची याहून अधिक चर्चा करण्यास त्यांनी नकार दिला.