नवी दिल्ली : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया करण्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. याबाबतची माहिती सुषमा स्वराज यांनी स्वत: ट्विटकरुन दिली आहे. सुषमा स्वराज ट्विटरवर म्हणाल्या, 'कुलभूषण जाधव यांचे कुटुंबीय आज मला भेटण्यासाठी आले होते. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.'
कुलभूषण जाधव यांना मार्च 2016 मध्ये हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया करण्याच्या आरोपावरून पाकिस्तानने अटक केली. तेव्हापासून कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्यास पाकिस्तान विरोध करत होते. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. याविरोधात भारताने कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याची तसेच त्यांना भारतात परत पाठवण्याची मागणी करत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने धाव घेतली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवासांपूर्वी कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असा आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. यामुळे भारताचा मोठा विजय झाला व पाकिस्तानला चपराक बसली आहे. फेरविचार होईपर्यंत या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम राहणार असल्याने कुलभूषण जाधव यांची फाशीही टळली आहे.
असा आहे घटनाक्रम ...३ मार्च २०१६ : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक केली.४ मार्च २०१६ : कुलभूषण हे भारताचे गुप्तहेर असून त्यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा.२६ मार्च २०१६ : इराणमध्ये कार्गोचा व्यवसाय करणा-या कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तानमधून अटक केल्याचा कोणताही सबळ पुरावा पाकिस्तानने दिला नसल्याचा भारताचा दावा.२९ मार्च २०१६ : कुलभूषण जाधव यांचा भारताच्या इस्लामाबाद येथील राजदूतावासाशी संपर्क करून देण्यात यावा अशी भारताची मागणी.१० एप्रिल २०१७ : पाकिस्तानमध्ये घातपाती कारवाया घडविण्याचा कट आखल्याचा व कारवाया केल्याच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवून त्यांना लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. तिची अमलबजावणी झाल्यास जाधव यांची केलेली ती पूर्वनियोजित हत्या असेल असे भारताने पाकिस्तानला बजावले.११ एप्रिल २०१७ : जाधव यांना न्याय मिळण्यासाठी भारत कसोशीचे प्रयत्न करणार असे तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केले.
१४ एप्रिल २०१७ : कुलभूषण जाधव यांच्यावर ठेवलेल्या आरोपपत्राची प्रमाणित प्रत तसेच त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या लष्करी न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत भारताने पाकिस्तानकडून मागविली. जाधव व भारतीय राजदूतावासातील अधिका-यांची भेट घडवून आणावी अशीही मागणी केली.२० एप्रिल २०१७ : कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानात चालविण्यात आलेल्या खटल्याच्या कामकाज व तसेच अपीलाची प्रक्रिया यांची सविस्तर माहिती देण्याची भारताची पाकिस्तानकडे मागणी.२७ एप्रिल २०१७ : जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तान भेटीसाठी व्हिसा द्यावा या मागणीसाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे तेव्हाचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांना पत्र लिहिले.८ मे २०१७ : कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याच्या पाकिस्तान लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले.९ मे २०१७ : जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती.१५ मे २०१७ : कुलभूषण यांना सुनावलेली फाशीची शिक्षा तातडीने रद्द करण्याची भारताची मागणी. त्यावरून पाकिस्तानशी भारताचे शाद्बिक युद्ध रंगले. आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्याचा पाकिस्तानचा आरोप.१८ मे २०१७ : खटल्याचा निकाल देईपर्यंत जाधव यांना फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये असा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पाकिस्तानला आदेश.२६ डिसेंबर २०१७ : कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नी व आईने पाकिस्तानातील तुरुंगात भेट घेतली. पाकिस्तानने अटक केल्यानंतर सुमारे एक वर्षाने कुलभूषण यांची त्यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली.
१८ एप्रिल २०१८ : आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधव खटल्यात युक्तिवादाच्या दुसºया फेरीतील लेखी जवाब भारताने सादर केला.१७ जुलै २०१८ : पाकिस्ताननेही युक्तिवादाच्या दुस-या फेरीतील लेखी जवाब आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सादर केला. जाधव यांना फाशीची शिक्षा का सुनावली याचे स्पष्टीकरण त्यात दिले होते.२२ आॅगस्ट २०१८ : जाधव खटल्याची सुनावणी फेब्रुवारी २०१९मध्ये होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जाहीर केले.२१ नोव्हेंबर २०१८ : कुलभूषण जाधव यांचा भारताच्या इस्लामाबादमधील राजदूतावासाशी संपर्क प्रस्थापित करण्याची सुषमा स्वराज यांची मागणी.१८ फेब्रुवारी २०१९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्याच्या चार दिवसांच्या सुनावणीला प्रारंभ.१९ फेब्रुवारी २०१९ : जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांची पाकिस्तानने तत्काळ मुक्तता करावी अशी भारताची न्यायालयात मागणी.२० फेब्रुवारी २०१९ : पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या कामकाजावरील आक्षेप भारताने मांडले. कुलभूषण यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे केली.२१ फेब्रुवारी २०१९ : जाधव यांची मुक्तता करण्याची भारताची मागणी फेटाळण्याची पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाला विनंती.४ जुलै २०१९ : कुलभूषण जाधव खटल्याचा निकाल १७ जुलै रोजी देणार असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाहीर केले.१७ जुलै २०१९ : कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पाकिस्तानने पुनर्विचार करावा व त्यांची भारतीय राजदूतावासाच्या अधिका-यांशी भेट घडवून आणावी असा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. या महत्त्वाच्या खटल्यात भारताची सरशी झाली.