मुंबई- हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी त्यांच्या पत्नी व आईला देण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिओ न्यूज'नुसार, कुलभूषण जाधव आणि पत्नी-आईच्या भेटीवेळी भारतीय दूतावासाचे अधिकारीही उपस्थित असतील, असं फैजल यांनी सांगितलं. याआधी पाकिस्तानकडून फक्त कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.
10 नोव्हेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना पाकिस्तानात भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. मानवतेच्या भावनेतून कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात येत असल्याचं पाकिस्तानने म्हटलं होतं .त्यानंतर कुलभूषण जाधव यांना आईलाही भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. तसंच आई आणि पत्नीच्याही सुरक्षेची हमी देण्यास सांगितलं होतं. कुलभूषण यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली होती.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्विट करून याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे. कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीला पाकिस्तानात येण्याचा व्हिसा देण्यात येत असल्याचं पाकिस्तान सरकारने सांगितलं आहे. याबद्दलची माहिती कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव यांनी दिल्याचं सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या ४६ वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी १३ डिसेंबर रोजी दिले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती.