ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - कुलभूषण जाधव यांच्या आईने व्हिसासाठी अर्ज करुनही साधी त्याची दखलही न घेतल्याबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना काही दिवसांपूर्वी चांगलंच धारेवर धरत खडे बोल सुनावले होते.
दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या प्रेशर पॉलिटिक्समुळे कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा मिळणार असल्याचं दिसत आहे. कारण पाकिस्ताननं गुरुवारी असे म्हटले की, भारताकडून कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा देण्यासाठी करण्यात आलेल्या विनंतीवर विचार केला जात आहे.
शिवाय, पाकिस्तानातील वृत्तपत्र ""नेशन डेली""नं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस जकारिया यांनी भारतात उपचार घेण्यासाठी व्हिसाची मागणी करणा-या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा प्रदान करण्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांवर निराशा व्यक्त केली आहे.
आणखी बातम्या वाचा
पाकिस्तानची ही भूमिका मांडण्यापूर्वी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी त्यांना चांगलंच खडसावलं होते. त्याचा परिणाम झाल्याचं दिसत आहे. स्वराज म्हणाल्या होत्या की, पाकिस्तान कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा देत नाही. यावरुन त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ यांना चांगलंच धारेवर धरत खडे बोल सुनावले आहेत. शिवाय, जाधव यांच्या आईला व्हिसा देण्यासंदर्भातही पत्रव्यवहारही केला होता. त्याची दखलही घ्यावीशी वाटली नाही", असे खडेबोल स्वराज यांनी अझीझ यांना सुनावले होते.
शिवाय, भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा नाकारल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून चुकीचे आरोप लावण्यावरुनही पाकिस्तानला सुनावले. सुषमा स्वराज यांनी ट्विट करत पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.
पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा मिळत नाही यामागे सरताज अझीझ कारणीभूत असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यामध्ये भारताला कोणतीही समस्या नसून आनंदच आहे, मात्र यासाठी अझीझ यांनी देशाच्या नागरिकांसाठी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितले.
यावेळी सुषमा स्वराजांनी कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांचा उल्लेख करत पाकिस्तानला धारेवर धरलं. "आपल्या मुलाला भेटण्यासाठी अवंतिक जाधव यांनी केलेला अर्ज अद्याप प्रलंबित आहे", हा मुद्दा त्यांनी मांडला.
कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र त्यांच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे.