नवी दिल्ली : पाकिस्ताननं पुन्हा एकदा खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचा आणखी एक व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जाधव असे सांगत आहेत की, 'आई काळजी करू नकोस. येथे (पाकिस्तानात) माझी काळजी घेतली जात आहे आणि या लोकांनी मला स्पर्शदेखील केलेला नाही. मला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर ती (आई) माझ्यावर विश्वास ठेवेल'.
या व्हिडीओमध्ये जाधव आपला गुन्हा कबुल करत आहेत आणि पुढे असेही सांगत आहेत की, मला भारतातील जनता, भारत सरकार व नौदलातील लोकांसोबत एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट सांगायची आहे की भारतीय नौदलातील माझी नोकरी गेलेली नसून मी आजही नौदलातील अधिकारी आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव टाकून जबरदस्तीनं ही वक्तव्य करण्यास त्यांना भाग पाडलं जातं व त्यानंतर यासंबंधीचा पाकिस्तानकडून व्हिडीओ जारी करण्यात येतो, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटले आहे.
दुसरीकडे, मागील आठवड्यात त्यांच्या आई व पत्नीबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेखही त्यांनी आपल्या व्हिडिओत केला आहे. मात्र या भेटीचा ज्या पद्धतीनं जाधव यांनी उल्लेख केला आहे त्यावरुन पाकिस्तानचा नीचपणा स्पष्ट दिसत आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये भारताविरोधात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानानं केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. आई जेव्हा भेटली तेव्हा भारतीय उप-उच्चायुक्त जे.पी.सिंह तिला ओरडत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. खरंत भेटीदरम्यान भारतीय उप-उच्चायुक्तांना काचेच्या एका वेगळ्या भिंतीमागे ठेवण्यात आले होते. जेथे ते जाधव व त्यांच्या आई-पत्नींमधील संभाषण ऐकूदेखील शकत नव्हते तसंच कोणताही हस्तक्षेप करण्यासही वाव नव्हता.
पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर
या व्हिडीओमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. कारण पाकिस्ताननं स्वतःच म्हटले होते भारतीय अधिका-यांना जाधव कुटुंबीय भेटीदरम्यान सहभागी होऊ दिले नाही. भेट झाल्यानं आई खूश झाली, असे जाधव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. पाकिस्तानकडून चांगली वागणूक मिळत असल्याचंही, जाधव यांच्याकडून वदवून घेण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांचा जारी करण्यात आलेल्या नवीन व्हिडीओमुळे आश्चर्यचकित करणा-या कोणत्याही गोष्टी नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटले आहे. पाकिस्तान जाधव यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून गोष्टी वदवून घेत आहे आणि त्यानंतर त्यांचा व्हिडीओ जारी करत आहे.