नवी दिल्ली- ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे काल रात्री दिल्ली येथे निधन झाले. गेली आठ दशके कुलदीप नय्यर विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय होते. धर्मनिरपेक्ष विचारांच्या नय्यर यांनी रा. स्व. संघ आणि भाजपाच्या विचारधारेवर नेहमीच टीका केली होती. मात्र जून महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात त्यांची प्रशंसा केल्यावर मात्र ते चकीत झाले होते.नय्यर यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नय्यर यांनी देशाला महान बनवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील अशा भावना त्यांनी ट्वीटरवर व्यक्त केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनीही ट्वीटरवरून नय्यर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नय्यर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1923 रोजी सियालकोटमध्ये झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सक्रीय होते, आपली मते मांडत होते. नय्यर यांनी अनेक राजकीय प्रश्नांवर भाष्य केले होते. बांगलादेश निर्मितीच्यावेळेस स्थानिकांवर झालेले अत्याचार असो वा अण्णा हजारे यांचे आंदोलन, ते व्यक्त होत राहिले. अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे वादही निर्माण झाले. बियाँड द लाइन्स, इंडिया अफ्टर नेहरु, वॉल ऑफ वाघा, द जजमेंट, द मार्टियर, इंडिया पाकिस्तान रिलेशन अशी १५ पुस्तके त्यांनी लिहिली.26 जून 1975 रोजी भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी या दिवशी आणीबाणीच्या काळामध्ये झालेल्या घटनांवर विचार करण्यासाठी देशभरात कार्यक्रम केले जातात. याचसंदर्भातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुलदीप नय्यर आणि रामनाथ गोयनका यांची प्रशंसा केली होती.,' त्यांच्यासारख्या लोकांनी माझ्यावर अनेकदा टीका केली आहे मात्र त्यांनी लोकशाहीसाठी लढा दिला आहे, त्यासाठी मी त्यांना सलाम करतो' असे मोदी या कार्यक्रमात म्हणाले होते.
यानंतर कुलदीप नय्यर यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना आपण नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचे सांगून त्यांच्यावर टीका करतो हेसुद्धा मान्य केले होते. 'यामध्ये काहीही वैयक्तीक नाही. हा सगळा विचारधारेचा मुद्दा आहे. ते हिंदुत्त्वावर विश्वास ठेवतात आणि मी त्याविरोधात आहेत. मी अत्यंत सेक्युलर आहे', असे मत त्यांनी मांडले होते.नय्यर यांनी भारतातील सध्याच्या काळाची तुलना आणीबाणीशी केली होती. भारतातील माध्यमांची स्थिती पाहून आपण हे वक्तव्य करत आहोत असे मत त्यांनी मांडले होते. माध्यमं ज्याप्रकारे प्रचाराला पाठिंबा देत आहेत त्यामुळे हे आणीबाणीचे संकेत आहेत असे ते म्हणायचे.भारतीय जनता पार्टीने संपर्क फॉर समर्थन हा कार्यक्रम हाती घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सत्तेत आल्यापासून कोणते कार्य केले आहे याची माहिती देण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह स्वतः विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. 9 जून रोजी त्यांनी कुलदीप नय्यर यांची भेट घेतली होती व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली होती. या मुलाखतीनंतर नय्यर यांनी आमचे विचार जुळत नाहीत. 'आमचे विचार वेगवेगळे आहेत. मात्र आम्ही अनेक विषयांवर विचारांचे आदानप्रदान केले', असे सांगितले होते.
या भेटीवर अमित शाह ट्वीटमधून आपले मत स्पष्ट केले होते.' संपर्क फॉर समर्थन अभियानांतर्गत प्रसिद्ध पत्रकार व राज्यसभेचे माजी सदस्य श्री कुलदीप नय्यरजी यांना मी भेटलो. या वयात देखिल त्यांच्या ऊर्जावान व्यक्तीमत्त्वाला पाहून प्रसन्न वाटले. गेल्या चार वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक परिवर्तनकारक कामे केली त्यावर मी त्यांच्याशी चर्चा केली.' असे ट्वीट त्यांनी केले होते.