जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथे ब्रिटिश महिला पर्यटकाचा विनयभंग केल्याप्रकरणी बिकानेरच्या नोखा येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. कुलदीप सिंग सिसोदिया असे आरोपीचे नाव असून बुधवारी त्याला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक विधायकपुरी पोलिसांनी आरोपी कुलदीपवर अटकेची कारवाई केली.
दरम्यान, आरोपी कुलदीप सिंग हा पेशाने शिक्षक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. जयपूर पोलिसांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाशचंद्र बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ १५ जून रोजी जयपूरमधील मोती लाल अटल रोडवरील हॉटेलबाहेरचा होता, असे तपासात समोर आले आहे.
बळजबरी केल्याप्रकरणी कारवाई मूळची ब्रिटनमधील असलेली एक महिला पर्यटक १४ जून ते १६ जून दरम्यान जयपूरमध्ये पर्यटनासाठी आली होती. ती तिच्या पतीसह एका हॉटेलमध्ये राहिली होती. तिथे १५ जून रोजी आरोपी कुलदीप सिंगने महिला पर्यटकाला एकटी पाहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिला बळजबरीने पकडून तो तिला पुन्हा पुन्हा स्पर्श करू लागला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेनंतर आरोपीने बिकानेर गाठले आणि एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवली असल्याचे कळते.
आरोपीला अटकघटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने राजस्थान पोलिसांना कारवाईसाठी पत्र लिहिले. यानंतर पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने आणि सायबर पोलिसांनी घटनेचा अधिक तपास करून आरोपी कुलदीप सिंगला बेड्या घातल्या. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. लक्षणीय बाब म्हणजे आरोपीने ओळख पटू नये यासाठी दाढी, केस बारीक करून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता.