नवी दिल्ली : उन्नाव येथील बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली जिल्हा न्यायालयाने भाजपने हाकलून लावलेले आमदार कुलदीप सिंह सेनगर यांना बुधवारी सदोष मनुष्यवधाबद्दल (हत्या नाही) दोषी ठरवले. बलात्कार पीडितेचे वडील ९ एप्रिल, २०१८ रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावले.जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी म्हटले की, पीडितेच्या वडिलांना ठार मारण्याचा सेनगर यांचा उद्देश नव्हता. वडिलांना क्रूरपणे मारहाण झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे शर्मा म्हणाले. २०१७ मध्ये महिलेवर बलात्कार केल्याच्या खटल्यात न्यायालयाने सेनगर यांना गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी ‘नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत’ तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. बलात्कार झाला त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती.केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या खटल्यात पीडितेला पाठिंबा देणारे ५५ साक्षीदार तपासले, तर सेनगर यांच्या बाजूने नऊ जणांची साक्ष झाली. बलात्कार पीडिता, तिचे चुलते, आई, बहीण आणि बलात्काराचा साक्षीदार असल्याचा दावा करणाऱ्या तिच्या वडिलांच्या एका सहकाºयाचे म्हणणे न्यायालयाने नोंदवून घेतले होते.>लिफ्ट नाकारताच झाली बाचाबाचीसीबीआयने दिलेल्या माहितीनुसार तीन एप्रिल, २०१८ रोजी पीडितेचे वडील आणि शशी प्रताप सिंह यांच्यात बाचाबाची झाली होती. १३ जुलै, २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केले गेले. त्यात म्हटले होते की, पीडितेचे वडील आणि त्यांचा सह कामगार हे मखी नावाच्या त्यांच्या खेड्यात परतत होते तेव्हा सिंह यांनी त्यांना लिफ्ट मागितली होती. ती नाकारल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. सिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावले. त्यानंतर कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुल सिंह सेनगर इतरांना घेऊन घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पीडितेचे वडील व त्यांच्यासोबत असलेल्याला मारहाण केली. पीडितेच्या वडिलांना ते लोक पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला व अटकही.
सदोष मनुष्यवधाबद्दल कुलदीप सिंह सेनगर दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:13 AM