हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काईस सौर गावातील एका घराला भीषण आग लागली. या आगीत घर जळून खाक झालं. यामध्ये लहान मुलगी आणि तिचे आई-वडीलही भाजले असून त्यांच्यावर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी घडली. आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवली. कुल्लू पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. एडीसी कुलू आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. कुल्लू प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. या घटनेत 2 वर्षाची मुलगी नव्या, 24 वर्षांची शारदा आणि 26 वर्षांची बुधराम जखमी झाले आहेत.
अग्निशमन विभागाचे अधिकारी ठाकूर दास वर्मा यांनी सांगितले की, सौर गावात एका घराला आग लागली होती. ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यात आली. या घटनेत पती, पत्नी आणि मुलगी भाजले. तिघांनाही स्थानिक लोकांनी बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेने कुल्लू रुग्णालयात पाठवले. घरातील शॉर्टसर्किट किंवा गॅस गळतीमुळे हा प्रकार घडल्याचे मानले जात आहे. या घटनेत घरातील नऊ खोल्या जळून खाक झाल्या असून 20 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
ही घटना सकाळी घडल्याचं घरमालकबुधराम यांनी सांगितलं. ते जेवण बनवण्याच्या तयारीत होते. गॅस सुरू करताच रेग्युलेटरने पेट घेतला आणि त्यानंतर आग संपूर्ण घरभर पसरली. मालकाने सांगितलं की, त्याची पत्नी आणि मुलगी भाजली असून आता त्यांच्यावर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.