नवी दिल्ली : “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणी दहशतवादी म्हटलेले नाही. तुम्ही फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या की दहशतवादी संघटनांचे सहानुभूतीदार गेल्या निवडणुकीच्या आधी तुमच्या घरी येत होते की नाही, असा प्रश्न माजी आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी विचारला आहे.
विश्वास म्हणाले,“मी त्या गोष्टींना आक्षेप घेतल्यावर मला पंजाबमधील बैठकांतून काढून टाकले गेले आणि त्यानंतर मी अशी एक बैठक रंगेहाथ पकडली होती. या बैठकीबाहेर हरयाणातील सुरक्षारक्षकाचा पहारा होता. आणि जेव्हा मला बैठकीला तेच लोक उपस्थित असल्याचे आढळल्यावर मला सांगण्यात आले की ‘इसका बडा फायदा होगा’. कुमार विश्वास यांनी म्हटले होते की, “अरविंद केजरीवाल यांनी मला एके दिवशी म्हटले होते की, एक दिवस मी पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा स्वतंत्र देशाचा (खलिस्तान) पंतप्रधान बनेन.”कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. चन्नी यांनी ट्विटरवर म्हटले की,“ राजकारण बाजूला ठेवा, पंजाबमधील जनतेने फुटीरवादाशी लढताना मोठी किमत मोजली आहे. प्रत्येक पंजाबीला वाटणाऱ्या काळजीचा माननीय पंतप्रधानांनी विचार करणे गरजेचे आहे.”
सुरक्षेचा घेणार आढावाकुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा केंद्र सरकार घेत असून त्यांना केंद्रीय संस्थेकडून सुरक्षा दिली जाऊ शकते, असे अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी म्हटले. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर विश्वास यांनी केलेल्या आरोपानंतर सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात असताना कुमार विश्वास यांनी केजरीवाल हे फुटिरांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केलेला आहे. राज्यात २० फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.
आरोप हास्यास्पद -अरविंद केजरीवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांनी केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याचे आणि शाळांच्या इमारती आणि रुग्णालये बांधणारा मी जगातील सर्वात मोहक दहशतवादी असलो पाहिजे, असे म्हटले. केजरीवाल म्हणाले, “भगत सिंग यांना ब्रिटिश दहशतवादी म्हणाले होते, परंतु, भगत सिंग यांच्यापेक्षा मोठा देशभक्त कोणी नाही हे देशाला माहीत आहे. “नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, चरणजित सिंग चन्नी, सुखबीर बादल, अमरिंदर सिंग, नवज्योत सिंग सिद्धू हे सगळे केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून देशाला तोडण्याचा कट रचत असून, एका भागाचा पंतप्रधान व्हायची त्यांची इच्छा असल्याचा आरोप करीत आहेत. हे आरोप खरे असतील तर मला अटक का करण्यात आली नाही.