नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या (आप) अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आता पत्रकार आशिष खेतान यांनी 'आप'च्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन आपचे नेते कुमार विश्वास यांनी आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
कुमार विश्वास यांनी ट्विटरच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल यांना खुर्चीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी योगदान दिल्याचे कुमार विश्वास म्हणाले आहेत. याचबरोबर, एका ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'आम्ही चंद्र गुप्त बनविण्यासाठी गेलो होते. मात्र, वाटले नव्हते चंदा गुप्ता बनेल'. आपचे नेते आशुतोष यांनी सुद्धा राजीनामा दिल्यानंतर कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, आपचे नेते आशिष खेतान यांनी काही खासगी कारणांसाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे 15 ऑगस्ट रोजी ई-मेलच्या माध्यमातून राजीनामा सुपूर्द केला आहे. वकिलीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राजकारणापासून थोडे दूर होत आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे ट्विट केले आहे. खेतान हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जातात. याआधीही खेतान यांनी दिल्ली डेव्हलपमेंट कमिशनच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची या कमिशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.