बंगळुरु : कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसचे काही आमदार प्रयत्न करत आहेत. यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपा अविश्वास ठराव आणण्याची शक्यता असून हा प्रस्ताव फेटाळण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
भाजपाच्या प्रमुख नेत्याने जरी अविश्वास प्रस्तावासाठी नकार दिला असला तरीही काँग्रेसने कोणताही धोका न पत्करण्याचे ठरविले आहे. यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील नेते सिद्धरामय्या यांनी आमदारांना अधिवेशनामध्ये जातीने हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. तर राज्य प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भाजपाच्या बहिष्कारावर टीका करताना हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. भाजपाने अविश्वास ठराव आणून तर दाखवावा, भाजपाने त्याचे नैराश्य राज्यपालांच्या भाषणावर बहिष्कार टाकून दाखवून दिले, असे सांगितले.