बंगळुरू : कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (एस) व काँग्रेस आघाडीचे सरकार केवळ शुक्रवार सकाळपर्यंतच राहील. नंतर ते निश्चितच कोसळेल, असा दावा भाजपचे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी बुधवारी केला. सदानंद गौडा हे सध्या केंद्रात मंत्री आहेत.
खरे तर कुमारस्वामी सरकारची अखेर उद्या, गुरुवारी संध्याकाळी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच होणार आहे, असे सांगून सदानंद गौडा म्हणाले की, राज्यात नव्या सरकार स्थापनेची तयारी आता करावीच लागणार आहे. गेले काही महिने सातत्याने भाजप कर्नाटकात सरकार स्थापनेची भाषा करीत आहे. तसेच काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, आम्ही लवकरच सरकार बनवू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी जाहीरच केले आहे.
कर्नाटक विधानसभेच्या २२४ (एक जागा रिक्त) जागांपैकी काँग्रेस-जनता दलाकडे ११६, तर भाजपकडे १0६ आहेत.प्रदेश काँग्रेसमध्ये कुरबुरी वाढल्याकर्नाटकात भाजपलाच सर्वाधिक जागा मिळतील, असे जवळपास सर्वच एक्झिट पोलचे निष्कर्ष आहेत. त्यामुळेच सदानंद गौडा यांनी वरील दावा केला आहे. कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरू असून, ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनी कालच राज्य नेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावला. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांची हकालपट्टी होईल वा ते स्वत:हून पक्ष सोडतील, अशी चर्चा आहे.