नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज पूर्ण करत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना चॅलेंज दिले आहे. मात्र, फिटनेस चॅलेंज स्वीकारण्याऐवजी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीच पंतप्रधान मोदींना वेगळंच चॅलेंज देत टोला हाणला आहे. ''माझ्या आरोग्यप्रती पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केल्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. मात्र मला राज्याच्या फिटनेसबाबत अधिक चिंता आहे'', अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला आहे. एवढंच नाही तर राज्याचं फिटनेस सुधारण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पाठिंब्याचीही मागणी केली आहे.
दरम्यान, विराट कोहलीनं दिलेलं फिटनेस चॅलेंज पूर्ण करत पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी योगाभ्यास करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, टेनिसपटू मनिका बत्रा आणि आयपीएस अधिकाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिलं.
(पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले विराटचे फिटनेस चॅलेंज, पाहा व्हिडीओ)पंतप्रधानांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत कुमारस्वामी यांनी आभार व्यक्त केले. ''शारीरिकरित्या सुदृढ असणं महत्त्वपूर्ण आहे आणि मी या गोष्टीचे समर्थनही करतो. योग-ट्रेडमिल हे माझ्या दैनंदिन शारीरिक कसरतीमधील हिस्सादेखील आहेत. मात्र तरीही आपल्या राज्याच्या फिटनेसबाबत मला अधिक चिंता आहे आणि यासाठी मला तुमचंही समर्थन हवंय'', असे कुमारस्वामींनी ट्विटमध्ये म्हटलंय.
असे सुरू झाले फिटनेस चॅलेंज22 मे रोजी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेसचं महत्त्व पटवून देण्यासाठी एका निराळ्या पद्धतीने सोशल मीडियाची मदत घेतली. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं होते. तेव्हापासून सोशल मीडियावर ‘फिटनेस चॅलेंज’ हे ट्रेंडमध्ये आहे.