बंगळुरू - कर्नाटकमधील राजकीय नाट्यामध्ये आज पुन्हा एकदा एक नवे वळण आले आहे. आमदारांची फुटाफूट होऊ नये म्हणून, भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसने आपापल्या आमदांरांना सुरक्षित स्थळी पोहोचवले असून, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे संकेत दिले आहेत. कुमारस्वामी यांनी सांगितले की, आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती निवळण्यासाठी आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाऊ. आम्ही कुठल्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी तयार आहोत.'' कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे संकेत दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस आणि जेडीएसप्रमाणेच भाजपानेही आपल्या आमदारांची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली आहे. आता तिन्ही पक्षांचे आमदार शनिवार आणि रविवारी बंगळुरूबाहेरील रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. भाजपालाही आपल्या आमदारांकडून बंडखोरी होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेले आमदार आणि संशयास्पद हालचाली असलेल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दरम्यान, कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. कर्नाटकातील जनता दल (एस) आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याच आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर येत्या मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका, असा आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे.