बंगळुरू - जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी कुमारस्वामी यांनी बुधवारी संध्याकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तर काँग्रेसचे नेते जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपाला बहुमत मिळवण्यात अपयश आले होते. त्यानंतर काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी जनता दल सेक्युलर पक्षाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर आज अखेर कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट झाली आहे. एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपाच्या प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डावे नेते सीताराम येचुरी, डी. राजा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी, तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू, शरद यादव हे उपस्थित होते.