बेंगळुरु : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये अस्थिर राजकारणाचे वारे वाहू लागले होते. बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी जेडीएस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. कमी जागा असूनही कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यांना राजकीय नाट्यामुळे मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले.
या सर्व घडामोडींनंतर सत्ता गेल्यावर कुमारस्वामींनी पहिल्यांदाच मनातील खदखद व्यक्त केली आहे. मी राजकारणात अपघातानेच आलो होतो. तसेच मुख्यमंत्रीही अपघातानेच बनलो. देवाने मला दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी तिथे कोणाला खूश करण्यासाठी बसलो नव्हतो. राज्याच्या विकासासाठी मी गेले 14 महिने चांगले काम केले आहे. मी समाधानी असल्याचे सांगत त्यांनी मनात चाललेली खळबळही व्यक्त केली आहे.
मी आजचे राजकारण कोणत्या थराला, दिशेला जात आहे हे पाहिले आहे. राजकारण हे श्रेत्र चांगल्या लोकांसाठी नाही. ते जातीयवादी आहे. मी ठरवले आहे. मला शांततेत जगायचे आहे. राजकारण माझ्या कुटुंबाला नकोसे झाले आहे. मला लोकांच्या हृदयात जागा हवी आहे. माझे ठरलेय मला राजकारणात राहायचे नाही. राजकारणातून दूर जाण्याचा विचार सुरु असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले.
भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. कर्नाटक विधानसभेत 224 आमदार असल्याने बहुमतासाठी 113 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, सभागृहातील आज उपस्थित आमदारांचा विचार केल्यास, काँग्रेसच्या बाजुने 95 आणि विरोधात 105 मतदान झालं आहे. त्यामुळे, कर्नाटकात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे.
कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली, असे म्हणता येईल. आज दिवसभरात काँग्रेसचे दोन आमदार गायब असल्याचे पाहायला मिळाले. तर 15 आमदार मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 20 महिन्यांनंतर कर्नाटकमधील सरकार कोसळले. या घटनेनंतर काय होऊ शकते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र बहुमत असल्याने भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलावले जाईल.