पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेसला खिंडीत गाठण्यात येणार आहे. चित्र स्पष्ट झाले असून माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज याची घोषणा केली आहे. लोकसभेला अद्याप ११ महिने आहेत, देवेगौडांनी मला याचे अधिकार दिले आहेत. निजद आमदारांच्या बैठकीत भाजपासोबत जाण्याचा व पुढील रणनिती ठरविण्याचा निर्णय झाला आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.
निधर्मी जनता दल भाजपाचा सहकारी पक्ष बनणार आहे आणि काँग्रेसविरोधात एकत्र काम केले जाणार असल्याची घोषणा कुमारस्वामी यांनी केली आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी काही महिन्यांपूर्वी याचे सुतोवाच केले होते. तेव्हापासून निजद एनडीएत सहभागी होण्यावरून चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतू, गेल्याच आठवड्यात त्यांनी आपण भाजपाशी हातमिळवणी केली नसल्याचे म्हटले होते.
बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या अधिवेशनात कुमारस्वामींनी काँग्रेसविरोधात भाजपाला पाठिंबा दिला होता. विरोधकांच्या बैठकीत ३० आयएएस अधिकाऱ्यांची तैनाती करण्यावरून कर्नाटक विधानसभेत गदारोळ झाला होता. यामुळे भाजपाच्या १० आमदारांना निलंबित करण्यात आले होते.
मी आधीच विधानसभेच्या आत आणि बाहेर असे म्हटले आहे की, भाजप आणि जेडी(एस) हे दोन्ही विरोधी पक्ष असल्याने राज्याच्या हितासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कुमारस्वामी म्हणाले. पक्षाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी देवेगौडांनी दिला असल्याचे, कुमारस्वामी म्हणाले.
२०१९ मध्ये माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचा तुमकूरमधून 13339 मतांनी पराभव झाला होता. भाजपाचे जी एस बसवराज यांचा विजय झाला होता. तर तेव्हा राज्यात कुमारस्वामींचे सरकार होते. परंतू, काँग्रेसच्या नेत्यांनी खूप त्रास दिल्याचा आरोप कुमारस्वामींनी केला होता.