बेंगळुरु- जनता दल धर्मनिरपेक्षचे नेते एच.डी कुमारस्वामी रामनगर येथून विजयी झाले आहेत. कुमारस्वामी हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असून माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष देवेगौडा यांचे ते पुत्र आहेत. 3 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या काळामध्ये ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. रामनगरमध्ये त्यांनी काँग्रेसच्या इक्बाल हुसैन यांचा पराभव केला आहे. कुमारस्वामी यांनी रामनगर आणि चन्नपट्टण या दोन जागांवरुन निवडणूक लढविली होती.
रामनगर आणि दक्षिण कर्नाटकामध्ये जनता दल सेक्युलरचे आधीपासूनच प्राबल्य होते. रामनगरला जिल्ह्याचा दर्जाही कुमारस्वामी यांनीच मिळवून दिला आहे. दक्षिण कर्नाटकातील वक्कलिग समाजामध्ये कुमारस्वामी यांचा दबदबा आहे. त्यांचे वडिल एच. डी. देवेगौडा यांनाही वक्कलिग समाजामध्ये विशेष आदर मिळतो. रामनगर या मतदारसंघाने कर्नाटकला आजवर तीन मुख्यमंत्री दिले आहेत. त्यामध्ये केंगल हनुमंतय्या, एच. डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी हे तीन मुख्यमंत्री या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत गेले आहेत.
एच डी. देवेगौडा यांनी जनता दल सेक्युलरच्या स्थापनेपासून पक्षाची जबाबदारी पाहिली आहे. 1977 साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व विरोधी पक्ष जनता पार्टी या नावाने एकवटले होते. 1988 साली जनता दलाची स्थापना करण्यात आली. जनता दलाने भारतीय जनता पार्टी व इतर पक्षांच्या पाठबळावर 1989 साली केंद्रात सरकार स्थापन केले होते. त्यासाठी नॅशनल फ्रंट गव्हर्नमेंट संज्ञा वापरली जाते. यामधील देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांनाही पुढे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली.
1999 मध्ये आघाडीतील काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काही नेत्यांनी देवेगौडा यांच्या साथीने जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे अध्यक्ष झाले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र 2002 साली कनकपुरा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ते विजयी झाले. 2004 साली जनता दल सेक्युलर पक्षाला 59 जागा मिळाल्या आणि त्यांनी सरकार स्थापनेसाठी आघाडीत प्रवेश केला. 2006 साली भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्युलर यांनी संयुक्त सरकार स्थापन केले. 2006 ते 2008 या कालावधीसाठी त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. मात्र 2008 साली त्यांच्या पक्षाला केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागले. 2008 साली सत्तास्थापनेच्या वाटाघाटींनुसार देवेगौडा यांनी भाजपाचे येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याचे नाकारले होते. तसेच सिद्धरामय्या यांनाही देवेगौडा यांना पक्षाबाहेर काढले होते. हे दोन्ही नेते पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.