अलाहाबाद- प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील सेक्टर 16 मध्ये असलेल्या वैष्णव पंथीय दिगंबर आखाड्यात 2 गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने आग लागली असून, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. आज सकाळपासूनच हलक्याशा वादळाची चाहूल होती, त्यामुळे आग फैलावली आणि आखाडा मंडप व संत, भक्त निवास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने जीवितहानी टळली.अग्निशमन बंब तातडीने पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले. लगतच्या आखाड्यांनीही धाव घेऊन मदत केली. सर्व सुखरूप असल्याचे महंत भक्तीचरणदास यांनी सांगितले. दरम्यान अग्निशामक बंब उशिरा आल्याचा आरोप करीत साधू वर्गानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लाकडे, बांबू व गवताने निवासासाठीच्या राहुट्या उभारलेल्या असल्याने व वाऱ्यामुळे आग पसरली. उच्चधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, संत व भाविकांच्या रोषाचा करावा लागतो आहे.
दिगंबर आखाड्यात चित्रकूट, उज्जैन व वृंदावनच्या बैठकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. तसेच 2 कारनं पेट घेतला आहे. त्याशेजारील गॅसवर चालणारे वाहन 2 मिनिटांपूर्वी बाहेर पडलेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागताच आखाड्यातील सर्व वाहने कंपाउंड तोडून बाहेर काढण्यात आलीत व अन्य राहुटयातील गॅस सिलेंडर्स बाहेर फेकण्यात आले, त्यामुळेही पुढील अनर्थ टळला.