हरिद्वार: देशात कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. तर उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजित केलेल्या कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान चैत्र पौर्णिमेला पार पडणार आहे. यासंदर्भात पाच आखाड्यांनी कुंभमेळा समाप्त केल्याची घोषणा केली असली, तरी बैरागी आणि वैष्णो संप्रदायांचे आखाडे शाहीस्नानासाठी थांबले आहेत. मात्र, कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (kumbh mela 2021 lockdown demands due to shahi snan in uttarakhand)
एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे मात्र, उत्तराखंडमधील तिसऱ्या शाहीस्नानाची तयारी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला मान देत ५ आखाड्यांनी कुंभमेळ्याचे समापन केल्याची घोषणा केली आहे. मात्र, काही आखाडे अद्यापही तिसऱ्या आणि चौथ्या शाहीस्नानासाठी थांबले आहेत. या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होत असून, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यासंदर्भात बैठक घेणार असून, या बैठकीत लॉकडाऊन लावायचा की नाही, यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. कुंभमेळ्यातील शेकडो संत, महंत, भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, उत्तराखंडमधील कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“कृपा करा, दिल्लीला ऑक्सिजन द्या”; अंबानीसह देशातील बड्या उद्योगपतींना केजरीवालांचे पत्र
उत्तराखंडातही अनेक समस्या
हरक सिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेशपासून देहरादूपर्यंत अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत आहे. रुग्णालयांवरील ताण वाढत चालला आहे. एकाच दिवशी ५ हजार कोरोनाचे रुग्ण आढळणे ही चिंताजनक बाब असल्याचे रावत यांनी म्हटले आहे.
तिसरे आणि चौथे शाहीस्नान
कुंभमेळ्यातील तिसरे शाहीस्नान चैत्र पौर्णिमा म्हणजेच २७ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच चौथे शाहीस्नान वैशाख पौर्णिमेला होणार आहे. तिसऱ्या शाहीस्नानासाठी बैरागी आणि वैष्णो आखाड्यांचे साधू हरिद्वार येथे जमा झाले आहेत. कुंभमेळ्या एकूण ४ शाहीस्नान आणि ११ अन्य स्नान होतात. दुसरीकडे, अनेक राज्यांनी कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांना चौदा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक केले आहे.
पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा
दरम्यान, मध्य प्रदेशमधील निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव हरिद्वार येथील कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.