देशातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असलेल्या कुंभमेळ्याला प्रयागराज येथे जानेवारी २०२५ पासून सुरुवात होत आहे. या कुंभमेळ्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असून, सिख फॉर जस्टिस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने कुंभमेळ्याला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्वाच्या विचारसणीला आव्हान देण्यासाठी हा हल्ला केला जाईल, असा इशारा गुरपतवंत सिंग पन्नू याने दिला आहे. तसेच इस्कॉनच्या पुजाऱ्यांना केलेल्या अटकेबद्दल पन्नू याने बांगलादेशच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं आहे.
कॅनडाने बांगलादेशच्या मॉडेलचं अनुकरण करावं, असं आवाहन सीख फॉर जस्टिसकडून करण्यात येत आहे, असेही गुरपतवंत सिंग पन्नू याने सांगितले आहे. तसेच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीला लक्ष्य करण्यासाठी २५ हजार अमेरिकन डॉलर एवढं बक्षीस पन्नू याने जाहीर केलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने पन्नूवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेले असून, त्याला गृहमंत्रालयाने २०२० मध्ये दहशतवादी घोषित केलेले आहे.
भारताने शीख फॉर जस्टिस संघटनेला देशविरोधी आणि विध्वंसक कृत्यामध्ये सहभागी असल्याने बेकायदेशीर संघटना घोषित करून या संघटनेवर निर्बंध घातले आहेत.