100 जणांची टीम, ड्रोन, हत्ती आणि सॅटेलाइट; 22 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सापडली 'निरवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 09:02 PM2023-08-13T21:02:07+5:302023-08-13T21:02:29+5:30
Kuno National Park News: गेल्या काही महिन्यांपासून कुनोतील चित्त्यांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे निरवाचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे होते.
Kuno National Park News: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून अचानक बेपत्ता झालेली मादा चित्ता निरवा अखेर सापडली आहे. 22 दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर रविवारी तिला पकडण्यात आले. सुमारे 100 जणांचे पथक, ड्रोन, हत्ती आणि सॅटेलाईटच्या मदतीने निरवाचा शोध घेत होते. निरवाच्या गळ्यातील कॉलर आयडी खराब झाल्यामुळे निरवाचे लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत होत्या.
21 जुलै रोजी अचानक सॅलेटाईटने निरवाचे लोकेशन पाठवणे बंद केले. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. अखेर 22 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर तिचा शोध लागला आहे. कुनो पार्क व्यवस्थापनाकडून निरवाला पकडण्यासाठी खूप प्रयत्न सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. 20 पैकी 9 चित्त्यांचा मृत्यू झाला असून, इतरांना आरोग्य तपासणीसाठी पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. पण, निरवा बेपत्ता होती.
कुनो पार्क व्यवस्थापनाने निरवाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली होती. अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर आणि चित्ता ट्रेकर्सचा समावेश असलेल्या 100 हून अधिक कर्मचार्यांची टीम रात्रंदिवस निरवाचा शोध घेत होती. याशिवाय फूट सर्च पार्टी, 2 ड्रोन टीम, 1 श्वान पथक आणि हत्तींचीही मदत घेण्यात आली. दररोज सुमारे 15-20 चौ.कि.मी. परिसरात शोधमोहीम सुरू होती.