श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. मंगळवारी (11 सप्टेंबर) सकाळीदेखील जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. कुपवाडातील हंदवाडा येथे चकमक सुरू होती.
चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शिवाय, कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (10 सप्टेंबर) रात्री उशिराच ही चकमक सुरू करण्यात आली होती. रात्री जवळपास 2.30 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. 30 राष्ट्रीय रायफल, 92 बटालियन सीआरपीएफ यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली.
(काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आयुर्मान घटले, दोन वर्षांत 360 दहशतवाद्यांचा खात्मा )
घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले तीन दहशतवादी अटकेत
दरम्यान, रविवारी (9सप्टेंबर)देखील जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये सीमेपलीकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. कुपवाडामधील करना येथे घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हे दहशतवादी काश्मीरमधील रहिवासी असून, दहशतवादाचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते पाकिस्तानमध्ये गेले होते.
पोलीस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेहसोमवारी (10 सप्टेंबर) कुपवाडा जिल्ह्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मोहम्मद हुसैन असे मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, पुढील चौकशी सुरू केली. हा पोलीस कर्मचारी एका बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात होता. बँकेच्या सुरक्षा गार्ड रुममध्ये त्याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला.