जम्मू/नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाला काश्मीरच्या सीमेवर उखळी तोफांचा मारा आणि अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानने २४ तासांत नियंत्रण रेषेवर केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एका महिलेसह सहा भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तानकडून सलग आठ दिवस सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची गंभीर दखल घेत परराष्ट्र सचिव अनिल वाधवा यांनी रविवारी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण केले आणि कठोर शब्दांत निषेध नोंदविला. अर्थात पाकिस्तानने नेहमीच्या खाक्यात हात झटकले आहेत. या घटनाक्रमाचे राजकीय गोटात तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या पातळीवर सुरू असलेली बोलणी त्वरित थांबवायला हवीत, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे.शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमागे नक्की कोण लोक आहेत, याचा शोध घेण्यासाठी एका प्रभावी यंत्रणेची गरज आहे, असे पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सांगितले.पाकिस्तानचा नियंत्रण रेषेलगत गोळीबारपाकिस्तानने शनिवारप्रमाणेच रविवारीही पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत भारताच्या सुरक्षा चौक्या आणि लोकवस्तीवर अंदाधुंद गोळीबार केला. यात एक महिला ठार झाली तर पाच अन्य जखमी झाले. शनिवारच्या हल्ल्यात पाच नागरिक मृत्युमुखी पडले होते. भारतीय लष्कराने गोळीबारास जशास तसे उत्तर दिले. पूंछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेलगतच्या रहिवासी भागांना लक्ष्य करीत पाकने गत ९ आॅगस्टपासून कायम गोळीबार व उखळी तोफांचा मारा चालवला आहे. रविवारी सकाळी बालकोट सेक्टरमधील नागरी वस्त्यांना पाकिस्तानने लक्ष्य केले. पाकविरोधी निदर्शनेभारताच्या अंतर्गत कारभारात कथित ढवळाढवळ करून जम्मू-काश्मीरच्या फुटीरवादी व राष्ट्रविरोधी शक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या पाकच्या कुरापतींचा जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) रविवारी जोरदार निषेध केला. जेकेएनपीपीच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत पाकिस्तानविरुद्ध नारेबाजी केली. नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकने चालवलेला गोळीबार हे क्रूरतेचे प्रतीक आहे. रहिवासी भागांवर हल्ला करून निष्पाप लोकांचे प्राण घेण्याच्या पाकच्या भ्याड कृत्याची मी तीव्र शब्दांत निंदा करतो. पाकिस्तान स्वत:ला मुस्लीम देश म्हणवतो आणि स्वत: इस्लामविरोधी कृत्ये करतो. पाक कुठल्या ‘इस्लाम’चा अभिमान बाळगतो आहे, मला ठाऊक नाही. - गुलाम नबी आझाद, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते
कुरापती सुरूच !
By admin | Published: August 17, 2015 1:48 AM