नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांची 19 जानेवारीला चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत तोमर यांनी आश्वस्त केले असून, कृषी कायद्यांबाबत मुद्देसूद चर्चा करावी, असे तोमर यांनी शेतकरी नेत्यांना सांगितलं आहे. शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीव्यतिरिक्त इतर पर्यायही मांडावेत, याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला. याच दरम्यान एका गावात बीजेपी आणि जेजेपी नेत्यांना नो एंट्री आहे.
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील कनीपला गावात जननायक जनता पार्टी (JJP) आणि भारतीय जनता पार्टीसाठी (BJP) बॅनर लावण्यात आले आहेत. जेजेपी आणि बीजेपी नेत्यांनी गावात येऊ नये असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. जर नेते या गावात आले, तर त्यांच्या परिस्थितीसाठी ते स्वत: जबाबदार असल्याचं देखील म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही पार्टीचा नेता असेल आणि जर तो शेतकऱ्यांना विरोध करत असेल तर त्याला गावात येऊ देणार नाही असं म्हटलं आहे. शेतकरी नेत्यांवर नाराज असल्याने त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अनेक गावांनी याआधी अशाप्रकारचे बॅनर लावून, बीजेपी आणि जेजेपी नेत्यांचा विरोध केला आहे. जो शेतकऱ्यांसोबत उभा राहील, तोच गावात पुढे जाईल, अशा आशयाच्या घोषणा गावात शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहेत. तसेच अशाप्रकारचे अनेक बॅनर गावात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु यावरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. 20 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
ट्रॅक्टर मार्चवरील सुनावणी तहकूब, न्यायालय म्हणालं,"दिल्लीत कोणी यायचं पोलिसांनी ठरवावं"
दिल्ली पोलिसांनी 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या ट्रॅक्टर मार्चला स्थगिती देण्यासाठी ही याचिका दाखल केली होती. प्रशासनानं काय करावं किंवा काय करू नये हे न्यायालय ठरवणार नसल्याचंही सुनावणीदरम्यान न्यायालयानं स्पष्ट केलं. "शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च अवैध असेल यावेळी दिल्लीत 5 हजार जण प्रवेश करण्याची शक्यता आहे," असं मत अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी व्यक्त केलं. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मार्च काढणाऱ्या शेतकऱ्यांनी या मार्चच्या रंगीत तालमीसाठी 19 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे. टिकरी सीमेवरील आंदोलनाच्या ठिकाणी याची रंगीत तालीम करण्यात येणार आहे.