उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून एक अजब घटना समोर आली आहे. प्रशासनाविरोधात एक व्यक्ती चक्क झाडावर चढला. आपल्या बहिणींचं जात प्रमाणपत्र बनवलं जात नसल्याने तो नाराज झाला होता. अधिकाऱ्यांवर आरोप करत या व्यक्तीने झाडावर माईकवरून जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे ऐकताच लोकांची मोठी गर्दी जमली.
सुरुवातीला तो खाली उतरायला तयार नव्हता पण खूप समजावल्यानंतर तो खाली आला. हा व्यक्ती भाजपा युवा मोर्चाचा माजी जिल्हा उपाध्यक्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. कुशीनगर जिल्ह्यातील कसयामधील हे संपूर्ण प्रकरण आहे. जिथे समाधान दिनानिमित्त तक्रारदार माईक घेऊन झाडावर चढला. झाडावर चढल्यावर तो गोंधळ घालू लागला.
तक्रारदार झाडावर चढल्याचे ऐकून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धक्काच बसला. तत्काळ पोलिसांना पाचारण करून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. निरीक्षकांनी प्रयत्न करूनही तक्रारदार झाडावरून खाली न आल्याने नायब तहसीलदारांनी घटनास्थळ गाठून त्यांची मागणी ऐकून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियेश गौर असं तक्रारदाराचं नाव आहे. तो भाजपचा स्थानिक नेता आहे.
कर्मचारी आपल्या दोन बहिणींचे प्रमाणपत्र बनवत नसल्याचा आरोप प्रियेशने केला. त्याला इकडे तिकडे फिरवले जात आहे. त्यामुळे तो त्रस्त झाला आहे, प्रियेशच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या बहिणींचे जात प्रमाणपत्र बनवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र प्रशासनाने जात प्रमाणपत्राचा अर्ज फेटाळून लावला.
अनेक दिवसांपासून तो प्रशासनाविरोधात आंदोलन करत होतो. पण काल संयम सुटला आणि झाडावर चढून सर्वांसमोर त्याने आपलं म्हणणं मांडलं. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रियेश गौर याच्या बहिणींचं जात प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रियेशचा आरोप फेटाळून लावला आहे.