हरीश गुप्ता
नवी दिल्ली : मोदी सरकारचा राजीनामा देत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी फारकत घेणारे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह बिहारमधील काँग्रेस-राजद महाआघाडीत सामील होण्याचे जवळपास निश्चित केले आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
महाआघाडीसह माझ्याकडे अनेक पर्याय आहेत, असे त्यांनी मागच्या आठवड्यात म्हटलेले असले तरी त्यांनी बिहारमधील काँग्रेस-राजदसोबत हातमिळविणी करण्याचा बेत पक्का केला आहे. एक-दोन दिवसांत यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोक समता पार्टीला (रालोसपा) बिहारमध्ये महाआघाडीत ४० जागांपैकी लोकसभेच्या पाच जागा दिल्या जातील. मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांचे नेतृत्व त्यांना स्वीकारावे लागेल. मागच्या आठवड्यात कुशवाह यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल आणि अखिलेश प्रसाद यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली होती, असे या सूत्रांनी सांगितले. बिहारमधील रालोसपाच्या तीन सदस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तर दिले नाही. तीन आमदारांनी कुशवाह हे स्वार्थी असल्याचा आरोप करीत बंडाचे निशाण फडकावले.घटक पक्षांची संख्या आता २२त्यांचे तीनही आमदार नितीशकुमार यांच्या गटात सामील झाल्याने रालोसपात फूट पडली असली तरी कुशवाह आपल्या समाजाचे नेते आहेत. त्यांच्या समाजाची लोकसंख्या ६ टक्के आहे, असा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. रालोसपा काँग्रेसप्रणीत महाआघाडीत सामील झाल्याने महाआघाडीतील घटक पक्षांची संख्या २२ झाली आहे.