नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एक मजेशीर फॉर्म्युला दिला आहे. Na(Mo) La(Mo) + Ni(Mo) -----> Bha(Go), हा फॉर्म्युला वापरा आणि देशातून पळून जा, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या सांकेतिक फॉर्म्युलामध्ये ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा उल्लेख केला आहे. यापैकी ललित मोदी यांच्यावर आयपीएलमधील गैरव्यवहारांच्या माध्यमातून बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. तर नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँकेतील नुकत्याच उघडकीस झालेल्या महाघोटाळ्यामुळे चर्चेत आले आहेत. हजारो कोटींचा घोटाळा करून ललित मोदी आणि नीरव मोदी देशातून सहीसलामत पळून गेले. त्यामुळे घोटाळेबाजांना देशातून पळून जाण्याचा नवा फॉर्म्युला मिळाला आहे, असे राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांनी कालच PNB Scam च्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केले होते. नरेंद्र मोदींना मिठी मारा, १२ हजार कोटी रुपये लुटा हेच नीरव मोदीचे सूत्र होते, अशी बोचरी टीका राहुल यांनी केली होती.
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रीच कँडी शाखेत घोटाळा झाल्याचे बुधवारी उघड झाले होते. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आज शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सूत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु झाली आहे. नीरव मोदी याच्या मुंबईसहीत तीन शहरांमधील शोरुम आणि कार्यालयांवर छापेमारी झाली आहे. या छाप्यांतून डीनं हिरे, ज्वेलरी, मौल्यवान खडे आणि सोनं असे 5 हजार 100 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.