उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक अनोखा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील फरेंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर वॉर्डातील एका मजुराच्या खात्यातून 4 कोटी 30 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. या व्यवहारानंतर इन्कम टॅक्सच्या नोटीसने खळबळ उडवून दिली. मजुराच्या तक्रारीनंतर फरेंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरेंदा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपूर वॉर्डातील एका घरात मजूर चंद्रभान पत्नी आणि मुलांसह राहतो आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मजूर म्हणून काम करतो. चंद्रभान हा आदेश अग्रहरीकडे कामाला गेला होता. याच दरम्यान, आदेश अग्रहरीने त्याला फसवलं आणि महिन्याला एक हजार रुपये पेन्शन मिळेल, असे सांगून चंद्रभानकडून त्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले.
आदेश अग्रहरीने त्याचं खातं सुरू करून व्यवहार केला. खात्यातून 4 कोटी 30 लाखांचा व्यवहार केल्यानंतर खातं इन्कम टॅक्सच्या रडारवर आलं आणि मजूर चंद्रभान यांच्या घरी इन्कम टॅक्सची नोटीस पोहोचली. ही नोटीस चंद्रभानच्या घरी पोहोचल्यावर धक्काच बसला. नोटीस मिळाल्यापासून पीडित मजूर चंद्रभान आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी इकडे तिकडे भटकत राहिला.
आपली तक्रार घेऊन तो उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या, त्यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं. पोलिसांनी आदेश अग्रहरीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.