केंद्रशासित प्रदेशात शुक्रवारी इतिहास रचला गेला, डोडा जिल्ह्यातील दुर्गम कहारा भागातील तीन भावंडांनी प्रतिष्ठित असलेली जम्मू-काश्मीर नागरी सेवा परीक्षा (JKCSE) उत्तीर्ण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यापैकी दोघांनी - इफरा अंजुम वानी आणि तिचा धाकटा भाऊ सुहेल अहमद वानी यांनी पहिल्याच प्रयत्नात प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तर तिघांपैकी सर्वात मोठी असलेल्या हुमाने दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सुहेल 111 वी रँक, हुमा 117 वी आणि इफरा 143 वी रँक मिळवली आहे. सुहेलने 2019 मध्ये सरकारी एमएएम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं आहे, तर हुमा आणि इफरा यांनी 2020 मध्ये इग्नूमधून राज्यशास्त्रात एमए केले आहे. या भावाबहिणींनी 2021 मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता.
मुलांचे वडील मुनीर अहमद वाणी हे मजूर म्हणून काम करतात आणि त्याची आई गृहिणी आहे. याशिवाय 2014 पर्यंत मुनीरने एका खासगी कंपनीत मेकॅनिक म्हणूनही काम केले आहे. मुनीर सांगतात की, हिवाळ्यात घरात 10-12 लोक आणि उन्हाळ्यात 6-8 लोक असायचे म्हणून त्यांच्या मुलांना एकच खोली शेअर करावी लागली.
इफरा म्हणाली, "आमच्या वडिलांचे तुटपुंजे मासिक उत्पन्न पाहता, आमच्याकडे मोबाईल फोन नव्हता. प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक होते, जे आम्हाला शेअर करायचे होते." त्यामुळे हुमा आणि सुहेलमध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून नेहमीच वाद होत होते. इफरा पुढे म्हणाली, ती दोघांमध्ये मध्यस्थी करायची, जेणेकरून ते एकमेकांसोबत सहकार्याने अभ्यास करू शकतील.
सुहेलने "आपल्या सर्वांसाठी हा यू-टर्न आहे" असं म्हटलं आहे. सुहेलला पोलीस सेवेत रुजू व्हायचे होते, कारण त्यांचा असा विश्वास आहे की "या सेवेमध्ये शक्ती आणि जबाबदारी दोन्ही येतात". याशिवाय सुहेलला जम्मू-काश्मीरमधील ड्रग्जच्या वाढत्या धोक्याविरुद्धही काम करायचे आहे, तर त्याच्या बहिणींना नागरी प्रशासनात सामील होऊन समाजातील उपेक्षित घटकांची, विशेषत: महिलांची सेवा करायची आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"