मजुराचे उजळले नशीब! खाणीत 30 लाखांहून अधिक किमतीचा सापडला हिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:21 PM2022-05-04T18:21:12+5:302022-05-05T15:13:17+5:30
Madhya Pradesh : 3 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मजुराला जेम्स क्वालिटीचा मोठा हिरा मिळाला असून त्याची किंमत लाखो रुपये आहे. दरम्यान, पन्ना हे हिऱ्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
पन्नाच्या (Panna) रत्नगर्भाची धरती कुणाला राजा बनवू शकेल, हे सांगता येत नाही. पन्नाच्या रत्नगर्भाने एका मजुराचे नशीब हिऱ्यासारखे उजळले आहे. मजूर आता रातोरात करोडपती झाला आहे. 3 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मजुराला जेम्स क्वालिटीचा मोठा हिरा मिळाला असून त्याची किंमत लाखो रुपये आहे. दरम्यान, पन्ना हे हिऱ्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते.
येथील धरतीने अनेक लोकांना रातोरात राजा बनवले आहे. असाच प्रकार कुआं येथील रहिवाशी प्रताप सिंह यादव (Pratap Singh Yadav) यांच्यासोबत घडला आहे. गरिबीने त्रस्त असलेल्या प्रताप सिंह यादव यांनी फेब्रुवारी महिन्यात शासकीय हिरे कार्यालयात अर्ज घेऊन 10 बाय 10 आकाराची हिऱ्याची खाण खोदण्यासाठी भाडेतत्त्वावर मंजुरी दिली घेतली होती. त्यांनी खाणीत रात्रंदिवस काम केले आणि आता त्यांचे नशीब बदलले आहे.
गरीब मजूर प्रताप सिंह यादव आज करोडपती झाला असून त्यांना खाणीतून हिरा मिळाला आहे. या हिऱ्याचे वजन 11.88 कॅरेट असून त्याची अंदाजे किंमत 30 लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रताप सिंह यादव यांनी हिरा कार्यालयात जमा केला आहे. हिऱ्यांच्या लिलावानंतर मिळालेल्या पैशातून आता आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि हे पैसे आपल्या मुलांच्या देखभाल आणि शिक्षणासाठी खर्च करता येतील, असे प्रताप सिंह यादव यांचे म्हणणे आहे.
'हिरा मिळालेल्या व्यक्तीला दिली जाईल रक्कम'
हे जेम्स क्वालिटीचे रत्न असून ते उच्च दर्जाचे मानले जाते आणि त्याची अंदाजे किंमतही खूप जास्त आहे. आता तो आगामी हिऱ्यांच्या लिलावात ठेवण्यात येणार असून त्याचा लिलाव होणार आहे. लिलावानंतर 12 टक्के रॉयल्टी कापून उर्वरित रक्कम हिरा मिळालेल्या व्यक्तीला दिली जाईल, असे हिरा अधिकारी रवी पटेल यांनी सांगितले.