ज्योती मौर्या यांच्यानंतर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या कोरबामध्ये ही घटना घडली. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या एका मजूर पतीने आपल्या शिक्षिका पत्नीवर नोकरी लावून दिल्यावर दुसऱ्याच पुरुषाशी संबंध ठेवल्याचा आणि तिला विरोध करताच सोडून गेल्याचा आरोप केला आहे. पत्नीला सक्षम बनवण्यासाठी पतीनेही आपली कमाई खर्च केली.
विश्वासघातकी पत्नीवर पतीने आता योग्य ती कारवाई करण्याची मागणी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शांती कुमार कश्यप असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा विवाह 6 मे 2011 रोजी कोरबा जिल्ह्यातील तिलकेजा येथील लुलेश्वरी कश्यप हिच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. शांती कुमार पुढे म्हणाले की, लग्नानंतर त्यांनी पत्नीची कागदपत्रं तयार करून घेण्यासाठी खूप धडपड केली.
पत्नीला पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली. मजुरी करून तिच्या शिक्षणासाठी येणारा खर्च केला. पण नोकरी मिळाल्यानंतर पत्नीचं दुसऱ्या तरुणावर प्रेम ज़डलं. शांती कुमार पुढे म्हणाले की, जेव्हा पत्नीच्या या कृत्याची माहिती सासरच्या लोकांना दिली. तेव्हा त्यांनी चुकीच्या मार्गाने जात असलेल्या मुलीला समजवायचं सोडून तिला माझ्याच विरोधात भडकवलं. पत्नीला सोबत घेऊन गेले. गेल्या दोन वर्षांपासून ती माझ्यासोबत राहत नाही.
पीडितेच्या पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी आधार कार्ड, जमिनीच्या रजिस्ट्रीचे कागद आणि इतर कागदपत्रे, सोने-चांदी आणि इतर वस्तू घेऊन निघून गेली आहे. पीडितेचा पती शांती कुमार यांनी सांगितलं की त्यांची पत्नी सध्या भदरापारा बाल्को प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. संतप्त झालेल्या पतीने आता आपल्या शिक्षिक पत्नीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली असून तिला शासकीय सेवेतून बडतर्फ करा असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.