जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या नौपुरा पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवान दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम चालू केली आहे. मुकेश कुमार असे मृताचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो काही काळ पुलवामा येथे मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता.
गेल्या २४ तासात ही दुसरी घटना आहे. या घटनेआधी रविवारी श्रीनगर येथील ईदगाह मैदानात एक पोलीस निरीक्षक दहशतवाद्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नौपुरालगतच्या टुममध्ये आज दुपारी सव्वा एक वाजता स्थानिक लोकांनी गोळी झाडण्याचा आवाज ऐकला. स्थानिक लोकांनी जेव्हा त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा त्यांनी एक तरुण मृतवस्थेत पडलेला दिसला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
या घटनेची माहिती पोलीस आणि निमलष्करी दलाचे पथकला देण्यात आली होती. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेत त्या तरूणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मृत्यू झालेल्या मजुराच्या साथीदारांचीही चौकशी करण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी मुकेशची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी श्रीनगरच्या ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. यानंतर पोलीस निरीक्षकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी हे ईदगाह मैदानात काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होते, तेव्हा काही दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांना गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पोलीस निरीक्षक मसरूर अहमद वानी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
"गेल्या पाच वर्षांत दहशतवादी घटनांमध्ये घट"दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दावा केला होता की, केंद्रशासित प्रदेशात गेल्या पाच वर्षांत दहशतवादाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. गेल्या पाच वर्षात ऑपरेशन्स दरम्यान कोणतेही कोलेट्रल डॅमेज झाले नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. या पाच वर्षांत पोलिसांच्या कारवाईत एकही नागरिक जखमी झालेला नाही, असे त्यांनी सांगितले होते. तसेच, या वर्षात आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ३० घटना घडल्या आहेत, असेही दिलबाग सिंह यांनी सांगितले होते.