खाणीत सापडला हिरा अन् क्षणातच मजूर झाला मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:09 AM2018-10-10T11:09:23+5:302018-10-11T12:34:16+5:30
मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब फळफळलं आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब फळफळलं आहे. जमिनीत खोदकाम करत असताना मजुराला 42.59 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला आहे. मोतीलाल प्रजापती असं हिरा सापडलेल्या मजुराचं नाव असून खाणीत सापडलेला हा सगळ्यात जास्त वजनाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा आहे. याआधी 1961 मध्ये येथे 44.55 कॅरेटचा सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा सापडला होता.
पन्ना येथील हिरा कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मोतीलाल आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी खोदण्याचं काम सुरु केलं होतं. त्याचदरम्यान त्यांना हा मौल्यवान हिरा सापडला. मोतीलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तो हिरा कार्यालयात येऊन जमा केला.
मोतीलालला सापडलेल्या हिऱ्याचा जानेवारी महिन्यात लिलाव केला जाईल. यातून मिळणाऱ्या रक्कमेतून सरकार कर कापून घेईल आणि उरलेली रक्कम मोतीलालला देण्यात येणार येईल अशी माहिती अनुपम सिंह यांनी दिली. माझ्या कुटुंबियांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं मोतीलालने म्हटलं आहे. जी रक्कम मिळेल ती रक्कम कुटुंबाच्या भल्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचंही त्याने सांगितलं. तसेच लिलावानंतर मिळणारे पैसे सर्व सहकाऱ्यांमध्ये वाटून घेतले जातील असंही मोतीलाल यांनी म्हटलं आहे.