चंदिगड - एका वेळेचे जेवण मिळावं, यासाठीदेखील तारेवरची कसरत करावी लागणारा एक मजूर रातोरात कोट्यधीश बनला आहे. पंजाबमधील मनोज कुमार याची ही कहाणी आहे. मनोज कुमारनं शेजाऱ्याकडून 200 रुपये उधारीवर घेत लॉटरीचे एक तिकीट विकत घेतले होते. 200 रुपयांच्या या तिकिटामुळे आपलं नशीब पालटणार आहे, याची कल्पनादेखील मनोज कुमानं केली नव्हती. मनोज कुमार आणि त्याची पत्नी पंजाबमधील संगरुर जिल्ह्यात एका वीटभट्टीत मजुरीचे काम करत होते. येथे काम केल्यानंतर त्यांना दिवसाला 250 रुपये मिळायचे. त्यात या दाम्पत्याला चार मुले होती. संसाराचा गाडा दोघंही कसाबसा चालवत होते.
पण 30 ऑगस्टचा दिवस या दोघांसाठी नवीन सकाळ घेऊन आला. उधारीच्या पैशांतून काढलेल्या लॉटरीच्या तिकिटातून मनोज कुमारनं दीड कोटी रुपये जिंकले. विशेष म्हणजे मनोजनं पहिल्यांदाच लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि त्यातून जे काही त्याला मिळेल ते 'छप्पर फाड के' मिळालं असंच म्हणावं आहे.
लॉटरीचे तिकीट जिंकल्याची माहिती मिळताच त्याचा आनंद गगनात मावेनास झाला. यातून आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याचं निर्णय घेतला आहे. हलाखीची परिस्थिती असल्यानं मनोजच्या मोठ्या मुलीच्या शिक्षणात खंड पडला होता. मात्र, मुलीचं शिक्षणाचं अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं त्यानं निश्चित केले आहे. बम्पर लॉटरीमुळे मनोज कुमारचं आयुष्य पूर्णतः बदललं आहे.