हा खरा 'हिरा'; 250 रुपयांची मदत केलेल्या मित्राला देणार दीड कोटीच्या हिऱ्यातील वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:31 PM2018-10-11T12:31:36+5:302018-10-11T12:41:31+5:30
मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब एका रात्रीत फळफळलं आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यामध्ये एका मजुराचं नशीब एका रात्रीत फळफळलं आहे. जमिनीत खोदकाम करत असताना मजुराला 42.59 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला आहे. मोतीलाल प्रजापती असं हिरा सापडलेल्या मजुराचं नाव असून खाणीत सापडलेला हा सगळ्यात जास्त वजनाचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा आहे. मोतीलालला सापडलेल्या हिऱ्याचा जानेवारी महिन्यात लिलाव केला जाणार आहे. लिलावानंतर मिळणाऱ्या पैशातील काही रक्कम मोतीलाल त्याच्या एका मित्राला देणार आहे.
कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मोतीलाल आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी खोदण्याचं काम सुरु केलं होतं. त्याचदरम्यान त्यांना एक मौल्यवान हिरा सापडला. मोतीलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तो हिरा कार्यालयात नेऊन जमा केला आहे. याआधी 1961 मध्ये 44.55 कॅरेटचा सर्वात मोठा आणि मौल्यवान हिरा सापडला होता. त्यानंतर आता मोतीलालला तब्बल दीड कोटी रुपयांचा हिरा मिळाला आहे.
मोतीलालला सापडलेल्या हिऱ्याचा जानेवारी महिन्यात लिलाव केला जाईल. यातून मिळणाऱ्या रक्कमेतून सरकार कर कापून घेईल आणि उरलेली रक्कम मोतीलालला देण्यात येणार आहे. मोतीलाल या रक्केमतील काही हिस्सा हा त्याला 250 रुपयांची मदत केलेल्या एका मित्राला देणार आहे. रघुवीर प्रजापती असं त्याच्या मित्राचं नाव आहे. मित्र अत्यंत गरीब असून त्याला पैशाची गरज असल्याने मोतीलालने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या कुटुंबियांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं मोतीलालने म्हटलं आहे. जी रक्कम मिळेल ती रक्कम कुटुंबाच्या भल्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचंही त्याने सांगितलं. तसेच लिलावानंतर मिळणारे पैसे सर्व सहकाऱ्यांमध्ये वाटून घेतले जातील असंही मोतीलाल यांनी म्हटलं आहे.