नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूंच्या काही सैनिकांना किरकोळ दुखापत झाली, असे भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले. पूर्व लडाखमध्ये 30 महिन्यांहून अधिक काळ दोन्ही बाजूंमधील सीमेवरील संघर्षाच्या दरम्यान गेल्या शुक्रवारी संवेदनशील भागात एलएसीवरील यांग्त्सेजवळ झटापट झाली.
भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, "9 डिसेंबर रोजी तवांग सेक्टरमध्ये एलएसीजवळ पीएलए सैनिकांशी झटापट झाली. आमच्या सैनिकांनी चिनी सैनिकांचा निर्धाराने सामना केला. या झटापटीत दोन्ही बाजूचे काही सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत." तसेच, "दोन्ही बाजूंनी लगेचच परिसरातून माघार घेतली. यानंतर आमच्या कमांडरने प्रस्थापित यंत्रणेनुसार शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनी समकक्षासोबत 'फ्लॅग मीटिंग' घेतली", असेही भारतीय लष्काराने म्हटले आहे.
याचबरोबर, लष्कराच्या निवेदनात झटापटीत सहभागी सैनिकांची संख्या आणि या घटनेत जखमी झालेल्या सैनिकांची संख्या नमूद करण्यात आलेली नाही. त्यात म्हटले आहे की, तवांग सेक्टरमधील एलएसी बाजूच्या भागांबद्दल दोन्ही बाजूंचे 'वेग-वेगळे समज' आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील एलएसीला लागून असलेल्या काही भागात दोन्ही बाजूंनी गस्त घातली आहे. ही प्रक्रिया 2006 पासून सुरू आहे, असे लष्कराने सांगितले. दरम्यान, या झटापटीत जखमी झालेल्या चिनी सैनिकांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते असे म्हटले जात आहे.
गलवान खोऱ्यातील घटनेनंतर पुन्हा मोठी झटापटदोन्ही देशांच्या सैन्यामध्ये 15 जून 2020 च्या घटनेनंतर अशा प्रकारची 9 डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये घडलेली पहिलीच घटना आहे. त्यानंतर लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक झटापटीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या झटापटीत चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते. 2020 मध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील भीषण संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध ठप्प झाले होते. दोन्ही बाजूंनी हळूहळू एलएसीवर हजारो सैनिक आणि अवजड शस्त्रे तैनात केली.