नवी दिल्ली : वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या आणखी हालचाली उघडकीस आल्या आहेत. डिसएंगेजमेंटनंतरही चीन पँगोंग लेकमध्ये आपल्या सैनिकांची तैनात वाढवत आहे. १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर चीनने पँगोंगमध्ये अतिरिक्त बोटी आणि सैन्य तैनात केले आहे. या वादग्रस्त भागात चीन आपली ताकद वाढवत आहे.
पँगोंग लेकमध्ये चीनने नवीन कॅम्प बांधण्यास सुरुवात केली आहे. या कॅम्पमध्ये अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पँगोग लेकमध्ये आणखी बोटी उतरविल्या जात आहेत. चीनच्या या हालचाली सॅटेलाइटमध्ये कैद झाल्या आहेत. पँगोंग लेकमध्ये चीन आपली शक्ती वाढवत असल्याचे सॅटेलाइट फोटोतून दिसून येत आहे.
२९ जुलैच्या सॅटेलाइट फोटोमध्ये बारकाईने पाहिले असता असे दिसून येते की, चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) नौदल फिंगर -५ आणि फिंगर -६ मध्ये तळ ठोकून आहे. फिंगर -५ वर पीएलएच्या तीन बोटी आणि फिंगर-६ मध्ये १० बोटी आहेत. प्रत्येक बोटीत १० जवान आहेत. म्हणजेच १३० जवान फिंगर -४ च्या अगदी जवळ तैनात आहेत.
याचबरोबर, १५ जूनच्या सॅटेलाइट फोटोमध्ये फिंगर-६ मध्ये पीएलएच्या ८ बोटी दिसल्या होत्या, त्या आता १० झाल्या आहेत. सॅटेलाइट फोटोमध्ये फिंगर-५ मध्ये पीएलएच्या नौदलाचे तळ दिसत आहे, ज्यामध्ये ४० कॅम्प दिसतात. २९ जुलैचा सॅटेलाइट फोटो असे दर्शवितो की चिनी सैन्याने आपली शक्ती वाढविली आहे. सॅटेलाइट फोटोमध्ये, ४० प्रीफॅबरिकेटेड (पूर्वनिर्मित) कॅम्प आणि सुमारे १५ तंबू दिसू शकतात. या व्यतिरिक्त, तेथे चार अतिरिक्त तंबू आहेत, जे बोटच्या क्रूसाठी बांधले असतील. प्रीफॅबरिकेटेड कॅम्पपासून असे समजते की, चिनी सैन्याने हिवाळ्याची तयारी सुरू केली आहे.
तंबूंच्या संख्येत हळूहळू होणाऱ्या वाढीवरून चीन पँगोंग लेकमध्ये आपली ताकद वाढवित असल्याचे दिसून येते. त्यामुळे याठिकाणाहून चीन माघार घेण्याच्या मन: स्थितीत दिसत नाही. विशेष म्हणजे, कोर कमांडर स्तराच्या चौथ्या बैठकीच्या दुसर्या दिवशी म्हणजेच, १५ जुलै रोजी, चीनी सैन्य फिंगर -४ वरून माघार घेत फिंगर -५ वर गेले. मात्र, फिंगर -५ ते फिंगर -८ पर्यंत चीन आपली ताकद वाढवत आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा
गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास दहा हजारांचा दंड, युपी सरकारकडून आदेश जारी
मंत्र्यांची कोरोनावर मात, पण स्वागतावेळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन