कोक्राझार : काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीमुळे आसामची पीछेहाट झाली आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत असलेल्या या राज्यामध्ये विकासाचा अभाव दिसून येतो, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल करीत मंगळवारी येथील रॅलीत भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला.आसाममधील दोन समुदायाला आदिवासी जमातींचा दर्जा देण्यासह विविध घोषणाही त्यांनी केल्या. भाजप आणि नव्याने स्थापन झालेल्या बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) बोडोफानगर येथे संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या जाहीरसभेत त्यांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला केला. बोडोलँड प्रांतीय परिषदेच्या (बीटीसी) अंतर्गत येणाऱ्या भूभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अन्य चार राज्यांसोबत आसाममधील १२६ सदस्यीय विधानसभेची निवडणूक एप्रिल- मे मध्ये होण्याची शक्यता आहे. या भागातील जनतेचा काँग्रेसने विश्वासघात केला आहे. या राज्याने देशाला दहा वर्षे पंतप्रधान दिला आहे. या राज्यात काँग्रेसचे १५ वर्षे आणि केंद्रातही सरकार असताना एवढे प्रश्न का निर्माण झाले. या पक्षाने १५ वर्षे काहीही केले नाही, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
आसाममध्ये विकासाचा अभाव
By admin | Published: January 20, 2016 3:22 AM