नवी दिल्ली : संसदेमध्ये कायदे बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेचा अभाव आहे, अशी टीका सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केले.ते म्हणाले की, संसदेमध्ये होणाऱ्या नव्या कायद्यांमध्ये संदिग्धता असते. हे कायदे करण्याचा हेतू न्यायालयाला माहीत नसतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संसदेत अतिशय अभ्यासू चर्चा होत असत. त्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांत विधायक हेतूने व विवेक राखून चर्चा केली जात असे.त्यांनी सांगितले की, सध्या संसदेमध्ये अभ्यासपूर्ण चर्चेअभावी कायदे बनतात. कायदे बनविताना पुरेशी चर्चा झालेली नसल्याने हे नवीन कायदे बनविण्यामागचे हेतू न्यायालयाला कळू शकत नाहीत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अनेक वकील संसदेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्या वकिलांमुळेच कदाचित संसदेत तेव्हा अभ्यासपूर्ण चर्चा झाली असावी. वकील समुदायाने पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनातमोठे योगदान दिले पाहिजे वसंसदेतील चर्चांमध्ये चांगला बदल घडवून आणायला हवा. संसदेत अभ्यासपूर्ण चर्चा होत नसल्यामुळे त्या कायद्यांविरोधात न्यायालयात अनेक याचिका दाखल होणे हे चांगले चित्र नाही. त्यामुळे संसदेत कायदे करताना उत्तम चर्चा होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
संसदेत कायदे बनविण्याच्या प्रक्रियेत चर्चेचा अभाव, सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 6:02 AM